Friday, October 9, 2009

'सिंहासन सापडलं' भाग २

भोजराजाने दोन्ही घोड्यांची शर्यत लावण्याचा हुकुम दिला, पण काय आश्चर्य ! घोडे जागचे हालेचनात. बरं एखादे पाऊल टाकलं तरी तें अगदी बरोबर ! आतां काय करावं ! नीलकंठ हिरा सरकारी खजिन्यात जमा करावा असाहि सल्ला कांहींनी दिला. पण राजाला तो पटला नाही. संपत्तीची वाटणी करणें सोपे होते. हिरा राजाच्याच ताब्यांत होता.

एक दिवस राजा शिकारीला बाहेर पडला. मनांतले विचार नाहींसे व्हावेत म्हणून तो एकटाच खूप दूर निघून आला. अवंती नगरीजवळच्या रानांत आल्यानंतर त्यानें आपला घोडा चरायला सोडून दिला आपण एका विशाल वटवृक्षाखाली आरामांत बसला.

थोडा वेळ गेला. शेजारीच त्याला गडबड ऎकूं आली म्हणुन त्यानें सहज मागे वळून पाहिले. कांबळी पांघरलेली, हातांत काठ्या घेतलेल्या गुराख्यांची पोरे एका झाडाखाली खेळ खेळत होती, त्याचा न्यायदानाचा खेळ चालला होता. शेजारच्या वृक्षाच्या घनदाट छायेखाली एक छोटासा मुलगा बसला होता.

आतां राजा उत्सुकतेनें त्यांच खेळ बघूं लागला. कांही सटरफटर तक्रारी विचारल्या गेल्या. न्यायदान करणारा मुलगा मात्र गंभीरपणें अस्खलीत भाषेंत बोलत होता. शेवटी एका मुलानें विचारले, 'राजा भोज यांच्या दरबारी खटला चालू आहे. त्याचा निकाल कसा काय लावावा हे अजून कोणाला समजले नाही तरी तो नीलकंठ हीरा कुणाला द्यावा ते आपण सांगावे ---'

0 comments: