Friday, October 9, 2009

'सिंहासन सापडलं' भाग १

फार फार पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी माळव्यांत राजा भोज राज्य करीत होता. त्याची राजधानी 'धारा' येथें होती. राजा रसिक, विद्वान शूर असल्यानें त्याचे पदरी अनेक विद्वान लोक होते. कलावंत होते. प्रजेच्या हितासाठी राजा खूप पैसा खर्च करीत असे. न्यायदानाच्या बाबतीत तर त्याचें कौशल्य वाखाणण्यासारखे होते. कुणावर थोडाही अन्याय होऊ नये यासाठी तो जागरुक राही.

एक दिवस काय झाले? दरबारांत एक फिर्याद दाखल झाली. वारा नगरीत एक श्रीमंत सावकार मरण पावला होता. त्याला दोन मुलगे होते. मृत्युपत्रांत सावकारानें एक विचित्र अट घातली होती, त्याच्या मुलांचे दोन सुंदर घोडे होते, त्या घोड्यांवर दोघांचेहि प्राणापलीकडे प्रेम होते. घोडेही मालकाच्या आज्ञेंत वागत असत.

मृत्युपत्रांत अशी अट होती की, 'या दोन घोड्यांची शर्यत लावावी. जो घोडा मागे राहील त्याच्या मालकाला संपत्तीतला सर्वात मोठा अमूल्य असणारा नीलकंठ हिरा मिळावा. उरलेल्या संपत्तीचे सारखे तीन भाग करावेत. दोन दोन्ही भावांनी घ्यावेत तिसरा धर्मकार्यासाठी खर्च व्हावा.'

0 comments: